बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

निजामुद्दीन अवलिया दरगाह


दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दरगाह

-संध्या पेडणेकर
दिल्ली ऐतिहासिक शहर आहे. याची साक्ष देणार्‍या कित्येक वास्तु दिल्लीत आहेत. या वास्तू दिल्लीचे अलंकारच आहेत म्हणा ना! त्यापैकी एक आहे हजरत निजामुद्दीन औलिया यांचा दरगाह- म्हणजे समाधीस्थळ. परगावाहून येणार्‍या आणि सूफी परंपरेबद्दल फारशी माहिती नसणार्‍या लोकांना आज या नावानं पूर्व दिल्लीत असलेलं स्टेशन हमखास आठवेल. त्या स्टेशनच नाव पडलं ते या दरग्यामुळे. या स्टेशनपासून दरगास्थळ खूप जवळ आहे.
हजरत निजामुद्दीन औलिया (इ. स. 1238-1325) यांना आदरानं महबूब-ए-इलाही म्हणजे इलाहीचा (अल्लाचा) प्रेमी असंही म्हटलं जातं. या शब्दाच्या आध्यात्मिक अर्थाला अतिशय वेगळा बाज आहे. 
हजरत बाबा फरीद हे हजरत निजामुद्दीन यांचे आध्यात्मिक गुरु. चिश्ती संप्रदायाची धुरा खांद्यावर ठेवताना त्यांनी निजामुद्दीनना सांगितलं होतं, 'विशाल वृक्षासारखा बन. देवानं निर्मिलेल्या मानवांना तुझ्या सावलीत आराम आणि शांती मिळू दे.
गुरु निजामुद्दीन औलिया यांच्या दरग्याशेजारी असलेले शिष्य अमीर
खुसरो यांचे समाधीस्थळ.  अमीर खुसरो यांच्या मजारीवर फातेहा वाचून
नंतर  लोकांनी निजामुद्दीन दरगाहला भेट द्यावी अशी अपेक्षा असते..
फोटो : संध्या पेडणेकर
गुरुच्या उपदेशानुसार आणि सूफी पंथाला अनुसरून हजरत निजामुद्दीन औलिया यांनी जी शिकवण दिली त्यानुसार दरवेशासाठी (फकीर) तीन गोष्टी गरजेच्या असतात, त्या म्हणजे इश्क (प्रेमभाव), अक्ल (विद्वत्ता) आणि इल्म (ज्ञान). मुळात सूफी हा प्रेमाचा पंथ.  या पंथात प्रेम हे एक आध्यात्मिक रसायन आणि या रसायनामुळे माणसाच्या ठायी मुळात असलेला माणुसकीचा भाव आणखी उदात्त बनतो असं मानलं जातं.  
मला या दरग्याबद्दल आकर्षण होतं ते आणखी एका कारणामुळे. हिंदीचे आद्यकवी मानले जाणार्‍या अमीर खुसरो यांची समाधीसुद्धा हजरत निजामुद्दीन दरगा परिसरात आहे. हजरत निजामुद्दीन हे अमीर खुसरो यांचे गुरु. या मुर्शिद(गुरू) आणि मुरीद(शिष्य) यांच्यामधील नात्याचं वर्णन बर्‍याच तिहासकारांनी करून ठेवलेलं आहे.
गुरू-शिष्यांमधील उदात्त नात्याचं श्रेष्ठ उदाहरण
अमीर खुसरो हे ख्वाजा निजामुद्दीन यांचे अत्यंत प्रिय शिष्य होते. अमीर खुसरोंनी 92 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या आपल्या या ब्रह्मचारी गुरूचं जीवन स्वर, रंग, प्रेम आणि भक्ती भावानं समृद्ध केलं. पहिल्या भेटीतच अमीर खुसरो यांच्यातील प्रतिभा हजरत निजामुद्दीन यांनी ओळखली होती. दररोज ईशाच्या नमाजानंतर काही काळ निजामुद्दीन एकांतसाधनेत घालवत असत. या काळात त्यांना कुणाही शिष्यानं भेटू नये अशी त्यांची ताकीद असे. अपवाद केवळ अमीर खुसरोचा. आपल्या या प्रिय शिष्याबद्दल बोलताना ते म्हणायचे की, कधीकाळी मला स्वतःचासुद्धा कंटाळा येईल, पण खुसरोचा अजिबात कधी कंटाळा येणार नाही.
निजामुद्दीन यांना आपल्या या शिष्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याची कल्पना होती. ते खुसरोंना म्हणत की – माझ्या जीवनावर तुझं जीवन अवलंबून आहे. म्हणून खुदापाशी माझ्या दार्घायुष्यासाठी प्रार्थना कर. तू खूप जगावंस, आपल्या शायरीनं जग सुगंधीत करावंस असं मला वाटतं. माझ्यानंतर तू फार काळ जगू शकणार नाहीस, म्हणून माझ्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना कर
!

किती विश्वास. पण तो अनाठायी अजिबात नव्हता हे पुढे सिद्ध झाले.
गुरुपाठोपाठ शिष्यानेही ठेवला देह
काही कामासाठी खुसरो दिल्लीबाहेर गेले असता त्यांना तेथे निजामुद्दीन औलियांच्या देहावसानाची बातमी मिळाली. खुसरो यांच्यावर हा मोठाच आघात होता. सैरभैर अवस्थेत ते तडक दिल्लीला परतले. संध्याकाळच्या वेळी जेव्हा त्यांनी हजरत निजामुद्दीन यांचा पार्थिव देह पाहिला तेव्हा त्यांच्या पायांवर डोकं आपटता आपटता ते मूर्छीत झाले. असं म्हणतात की त्यावेळी त्यांच्या तोंडून ओळी उमटल्या -
फोटो - संध्या पेडणेकर
गोरी सोवे सेज पर मुख पर डारे केस।
चल खुसरो घर आपने सांझ भई चहुं देस।।

गुरुच्या मुत्यूनंतर खुसरो यांनी सर्व सांसारिक मोहपाशातून स्वतःला मुक्त केलं. मिळवलेलं सारं धन गरीबांना वाटलं आणि काळी वस्त्रं धारण करून गुरुच्या समाधीजवळच राहिले– आत्मोत्सर्जनापर्यंत.
निजामुद्दीन दरगा परिसरातच अमीर खुसरो यांचीही समाधी आहे. दरवर्षी येथे उरुस भरतो आणि या उरुसाची सुरवात खुसरो यांच्या याच दोह्यानं केली जाते. यावर्षी उरुसादरम्यान या दरग्याला भेट दिली  त्यावेळी घेतलेला हा फोटो. 
अमीर खुसरो
अमीर खुसरो यांचं पूर्ण नाव - अबुल हसन यमीनुद्दीन खुसरो. पण ते प्रसिद्ध आहेत अमीर खुसरो दहलवी किंवा अमीर खुसरो या नावानं. ई. स.1253 ते 1325 हा त्यांचा काळ. ते कवी, संगीतकार आणि विद्वान होते आणि दिल्ली सल्तनतीतील तब्बल सात राज्यकर्त्यांच्या दरबारात त्यांनी जबाबदारीची पदं भूषवली. गीत-संगीताच्या दुनियेत त्यांनी कित्येक नवनवीन शोध लावले असं जाणकार संगीतकारांचं मत आहे. खयाल (गायकी), सतार (तंतुवाद्य), कव्वाली आणि झूला गीत (काव्य आणि गायकीचा प्रकार) निर्मितीचं श्रेय त्यांना दिलं जातं. हिंदुस्तानी संगीताला पर्शियन आणि अरबी अंगाची जी झालर त्यांनी दिली त्यातूनच पुढे खयाल आणि तराणा शैलीचं संगीत निर्माण झालं असं तज्ञांचं मत. काही लोकांच्या मते तबल्याचा शोधही त्यांनीच लावला. कव्वाली हा सूफी संगीतातील भक्तीकाव्याचा प्रकार त्यांनी प्रसवला. गजल, मसनवी, रुबाई, कसीदा इत्यादी कित्येक काव्यप्रकार त्यांनी रूढ केले. पर्शियन, अरबी, हिंदुस्तानी आणि संस्कृत या चार भाषा त्यांना येत. अतिशय प्रतिभावंत अमीर खुसरो यांच्या व्यक्तीमत्वाबद्दलच्या कित्येक आख्यायिका संपूर्ण उत्तर भारतात आणि पाकिस्तानातच नव्हे तर अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, आणि तुर्कमेनिस्तानसारख्या दक्षिण आशियातील आणि मध्य आशियातील इतर देशातही प्रचलित आहेत. त्यांचं साहित्य या सर्व देशांमध्ये अत्यंत आवडीनं वाचलं, गायलं आणि ऐकलं जातं.
हजरत निजामुद्दीन दरग्याशेजारी असलेली अमीर खुसरो यांची समाधी
एखाद्या विषयाबद्दल आपल्याला जेव्हा खूप काही बोलायचं असतं  तेव्हा कधी कधी नेमकी सुरुवात कुठून करायची हेच लक्षात येईनासं होतं. अमीर खुसरोंबाबत माझं नेहमी असंच होतं. माझ्याच नव्हे तर कुणाही ऐकणार्‍याच्या मनाचा ठाव घेणारे त्यांचे काव्यप्रकार ऐकताना भान हरपून जायला होतं. त्यांची एक एक गीतं, एक एक कलाम आणि दोहे कित्येक नामी गायकांच्या आवाजात उपलब्ध असण्यामागील कारणही हेच असावं. त्यांच्या काव्यातील गोडवा एकदा तरी अनुभवावाच. त्यांच्या काही गीतांच्या लिंक्स मी इथे देतेय. बर्‍याच गायकांनी गायिल्या असल्यामुळे काही वेळा या रचना लोकगीतं तर नव्हेत असा संभ्रम आपल्या मनात निर्माण होतो. या काव्यातून त्यांना असलेली लोकमानसाची जाण, त्यांची गेय शब्दयोजना, त्या शब्दांमधून व्यक्त होणारा गहिरा, थेट हृदयाला भिडणारा भाव हे सारं आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. मात्र ती दुनिया आपल्या जगाशी कायम जवळीक सांगत राहाते हे विशेष. हे पहिलं गीत –
अम्मा मेरे बाबा को भेजो जी- सावन गीत
http://www.youtube.com/watch?v=RI9QM2FpIpo
या गीतात सासरी गेलेली पोर आपल्या आईला विनंती करतेय की मला माहेरी नेण्यासाठी बाबांना धाड, भावाला धाड, मामाला धाड. आणि आई तिला त्या त्या व्यक्तीला पाठविता न येण्यामागील कारणं सांगतेय.
गोरी सोवे सेज पे - 
प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा व्यक्त करणार्‍या या दोह्यांमधील भाव थेट हृदयाला भिडणारा.
या बंदिशमध्ये केलेली तक्रार तर ऐका
जो पिया आवन कह गए आए न बारह मास- 
त्यांनी घातलेल्या कोड्यांची मजा आगळीच. कोडी वाचून समजून घ्यायची असल्यास या लिंक वर टिचकी मारावी
कोडी ऐकण्यासाठीची ही लिंक
वेगवेगळ्या कसलेल्या गायकांनी गायलेल्या त्यांच्या काही इतर रचनांच्या लिंक्स  - 


 दिल्लीबद्दल मनात असलेला परकेपणा पुसट करण्यास मोठा हातभार लावणार्‍या या माझ्या आवडत्या कवी व्यक्तीमत्वाची समाधी आपल्या घरापासून अतिशय जवळच आहे हे समजलं तेव्हा मी अतिशय आनंदले. पूर्व दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात असलेल्या गुरु हजरत निजामुद्दीन आणि शिष्य अमीर खुसरो यांच्या शेजारी शेजारी असलेल्या समाधींस्थळांना भेट दिली तेव्हा हृदय अगदी भरून आलं होतं आणि मनात त्यांच्या कवितांच्या ओळी घेर धरून तालावर घुमत होत्या.
बहुत कठिन है डगर पनघट की। कैसे मैं भर लाऊं मधवा से मटकी।।
पनिया भरन को मैं जो गई थी। दौड झपट मेरी मटकी फटकी।
खुसरो निजाम के बल बल जायिये। लाज रखो मेरे घुंघट पट की।….”  


------
संदर्भ दुवे-
·         http://www.ektaramusic.com